बाल सुरक्षा धोरण

Published on

कामायनी प्रशिक्षण आणि संशोधन सोसायटी

२७० बी जांभेकर पथ, गोखलेनगर, पुणे ४११०१६

बाल सुरक्षा धोरण

अनुक्रम

प्रास्ताविक

सुरक्षा धोरणाविषयी

धोरणाची उद्दिष्टे ………                                                  १

बाल सुरक्षा समिती

व्याप्ती

शिक्षक कर्मचारी यांच्या साठी  आचारसंहिता

मुलांसाठी आचारसंहिता    .. .. .. .. ..                               २

सोयी सुविधा

वाहतूक सुरक्षा

गोपनीयता .. …. .. ..                                                      ३

दुराचाराचे वृत्त निवेदन

मुलांचे समुपदेशन .. .. .. ..                                              ४

पालकांना कळविण्याविषयी

दक्षतासूची .. .. .. ..                                                         ५

शब्दमंजुषा .. .. ..                                                           ६

प्रथम प्रसारण – २७ नोव्हेंबर २०२४

प्रास्ताविक

कामायनी प्रशिक्षण आणि संशोधन सोसायटी तर्फे दोन शाळा गोखलेनगर व निगडी येथे गेली तीसहून अधिक वर्षे चालविल्या जातात. यांमध्ये अनुक्रमे १२० आणि १०० विद्यार्थी अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत शिक्षण घेतात. दोन्ही शाळा अनुदानप्राप्त असून त्यांचा अभ्यासक्रम “दिशा” प्रारूपानुसार चालविण्यात येतो.

कामायनी संस्थेचे उद्दिष्ट हे बौद्धिक अक्षमता असणाऱ्या व्यक्तींना समाजात सन्मानाने सहभाग मिळावा हे आहे आणि त्यासाठी अंगीकृत कार्य म्हणजे अशा व्यक्तींना शिक्षण आणि व्यवसाय शिक्षणाद्वारे स्वयंपूर्ण बनविणे आणि त्यासाठी आवश्यक ते संशोधनात्मक उपक्रम राबविणे होय.

दोन्ही शाळातील विशेष शिक्षक हे बौद्धिक अक्षम व्यक्तींसाठीचे  विशेष शिक्षण यांमधील पदविका धारण करणारे असतात. तसेच भारतीय पुनर्वास परिषद यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या निरंतर शिक्षण उपक्रमातून आपले ज्ञान अद्ययावत ठेवीत असतात.

सुरक्षा धोरणाविषयी

हे धोरण आखण्यामागील हेतू हा आहे की बालकांचे बालपण हे निकोप वातावरणात व्यतीत व्हावे आणि त्यांना कोणत्याही धोक्याला तोंड द्यावे लागू नये. अठरा वर्षांखालील मुला -मुलींना दुखऱ्या/धोकादायक  स्थितीत जाण्यापासून वाचवणे, त्यांच्याभोवती सुरक्षा कवच उभे करणे आणि घातक स्थितीतून त्यांना बाहेर काढणे यासाठीच्या तरतुदी या धोरणातून पुरविल्या जात आहेत. असे संरक्षण मिळणे हा बालकांचा महत्त्वाचा हक्क आहे. तो हक्क मिळत नसेल तर बालकांना इतर हक्कांचा वापर करता येत  नाही.

भारतीय संविधानानुसार बालकांना सुरक्षितता देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.  या धोरणामुळे केवळ कामायनीतील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे, तो असा की मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय केले पाहिजे हे सुस्पष्ट राहील आणि सर्वांच्या कृती सुसंगत आणि सातत्यपूर्ण  राहतील.

धोरणाची उद्दिष्टे

कित्येकदा मुलांचे हक्क डावलले जातात आणि त्यांना खरोखर मनापासून सन्मान दिला जात नाही. आम्ही या धोरणाद्वारे  मुले आणि पालक यांना हे कळवू इच्छितो की कामायनीच्या शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. सुरक्षा म्हणजे शाळेच्या नियमित कार्यक्रमात सहभाग घेताना दुखापत, दुराचार आणि शोषण यांच्यापासून संरक्षण मिळणे. ती सुरक्षा मिळविण्यासाठी मुले आणि शिक्षक-कर्मचारी यांनी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे हे घालून देणारी आचार संहिता दोघांनाही लागू आहे.

बालसुरक्षा समिती

प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आहे. शाळा प्रमुख, एक कार्यकारिणी सदस्य, एक शिक्षक प्रतिनिधी आणि एक कर्मचारी प्रतिनिधी यांच्या जोडीला एक बाहेरील तज्ज्ञ अशा पाच जणांची समिती असून किमान दोन प्रतिनिधी महिला असाव्यात अशी रचना आहे. परिस्थितीचा साकल्याने विचार करून कोणताही पूर्वग्रह न ठेवता निर्णय प्रक्रियेला मदत करणे हे या समितीचे काम आहे.

व्याप्ती

या धोरणाच्या कक्षेत कामायनीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी आणि त्या त्या शाळेतील मुले येतात. सुरक्षेशी संबंधित सर्व पैलूंचा विचार या धोरणात केला असला तरी बदलत्या परिस्थितीत नवीन आणि किंवा सुधारित तरतुदींची आवश्यकता भासू शकते. म्हणून या धोरणाचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन योग्य ते बदल केले जातील.

पदाधिकारी, शिक्षक  व कर्मचारी यांच्यासाठी आचार संहिता

मुलांसोबत वर्तन करताना खालील गोष्टी कटाक्षाने पाळल्या जाव्यात:

१.  मुलांसोबत असताना आपले ओळखपत्र समोरून दिसेल अशा पद्धतीने लावले पाहिजे.

२.  वेषभूषेबद्दलचे संकेत तंतोतंत पाळले पाहिजेत.

३.  वावर व बसणे या हालचाली औचित्यपूर्ण असल्या पाहिजेत.

४. मुलांशी बोलणे संयमी व सौजन्यपूर्ण असले पाहिजे.

५. मुलांची कोणत्याही कारणाने हेटाळणी करता कामा नये.

६. मोठ्या माणसांशी ज्या आदरभावाने बोलतो तसेच मुलांशी बोलले पाहिजे.

७. कोणत्याही परिस्थितीत मुलगा अथवा मुलगी यांना एकटे गाठता कामा नये.

८. मुलांना कोणत्याही कारणाने स्पर्श करता कामा नये.

९. जर एखादा मुलगा अथवा मुलगी भेदरलेल्या अवस्थेत दिसल्यास संबंधित शिक्षकास त्वरित सांगावे आणि त्या मुलाशी शांतपणे बोलावे.

१०. जर एखाद्या मुलास प्रथमोपचार द्यायचा असेल तर तेथे आणखी एक व्यक्ती उपस्थित आहे असे पाहून मगच मदत द्यावी.

मुलांसाठी आचार संहिता [ पालकांनी अमलात आणण्यासाठी ]

१. मुलांनी सर्व कर्मचाऱ्यांशी सौजन्य आणि आदर राखून बोलले पाहिजे.

२. मुलांनी शाळेत व सर्व समारंभांमध्ये जसे सांगितले असतील त्या प्रकारचे  कपडे घातले पाहिजेत.

३. मुलांनी आपसात तसेच कर्मचाऱ्यांशी बोलताना शिवराळ किंवा ओंगळ भाषा वापरता कामा नये.

४. सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी शिस्तीचे पालन केले पाहिजे.

५. आवारात कोठेही  अनारोग्य पसरविणारी वागणूक करता कामा नये.

६. एखादा कर्मचारी अथवा विद्यार्थी धोकादायक अथवा अनुचित कृती करीत असताना आढळल्यास त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणली पाहिजे.

सोयी सुविधा

१. इमारत आणि तिचे सर्व कक्ष मुलांसाठी सुरक्षित ठेवले गेले पाहिजेत.

२. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली असून ती चालू स्थितीत असली पाहिजे.

३. कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत मुलांसह सर्वांना सुरळीतपणे सुरक्षित ठिकाणी पोचता आले पाहिजे.

४. प्रत्येक कार्यकक्षात प्रथमोपचार साहित्य उपलब्ध असले पाहिजे आणि ते उपयोगी स्थितीत असले पाहिजे.

५. प्रथमोपचारात प्रशिक्षित व्यक्ती केंद्रात उपस्थित असली पाहिजे.

६. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध असून त्यांची नियमित निगा राखली पाहिजे.

७. इमारतीतील सर्व भाग हे स्वच्छ असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था  कार्यरत  पाहिजे.

८. कोणतेही मूल सापडत नाही अशी स्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक  कक्ष वापरात नसताना कुलूपबंद करण्याची व्यवस्था कार्यरत पाहिजे.

वाहतूक सुरक्षा

कामायनी शाळेच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल पुढील काळजी घेतली जाईल.

१. वाहन चालक विश्वासू, परवानाधारक  आणि मार्गाचा माहितगार असला पाहिजे.

२. त्याजबरोबर मुलांची काळजी घेण्यासाठी एक पुरुष आणि एक महिला परिचर असले पाहिजेत. त्याजपैकी कोणी गैरहजर असल्यास पालकांपैकी एकाने मुलांबरोबर राहिले पाहिजे.

३. वाहन सुस्थितीत असून त्याचा विमा चालू पाहिजे.

४. वाहनाचा परवाना चालू स्थितीत पाहिजे.

गोपनीयता

मुलांच्या आणि संस्थेच्या सुरक्षिततेसाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

१. प्रत्येक मुलाची माहिती स्वतंत्रपणे ठेवली  जाऊन ती केवळ संस्थेने निर्देशित केलेल्या अधिकृत व्यक्तीला

उपलब्ध होऊ शकेल.

२. मुलांची छायाचित्रे काढण्यापूर्वी मुख्याध्यापकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. ती चित्रे केवळ संस्थेच्या अधिकृत स्थळांवरूनच समाजमाध्यमांत  प्रसारित केली जाऊ शकतील. विना मान्यता मुलांची छायाचित्रे व माहिती समाजमाध्यमांवर टाकणे हे गंभीर गैरवर्तन समजले जाईल.

३. संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुलांची वैयक्तिक माहिती गोपनीय राखली पाहिजे आणि ती कोणासही उपलब्ध करून देता कामा  नये. अशी माहिती देण्याचा अधिकार केवळ मुख्याध्यापकांकडे राहील.

४. एखाद्या मुला/मुली ने काही वैयक्तिक माहिती आपल्यास सादर केली असल्यास त्यावर काय पाऊल उचलायचे हे काळजीपूर्वक ठरवले पाहिजे आणि उतावळेपणा टाळला पाहिजे. कृती करण्यापूर्वी मुलाची संमती घेणे आवश्यक आहे.

५. दुराचाराच्या कोणत्याही प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांची माहिती कटाक्षाने गोपनीय ठेवली पाहिजे.

६. दुराचाराची वार्ता अधिकाऱ्यांकडे देताना संबंधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र कदापि वापरू नये.

दुराचाराचे वृत्त निवेदन करण्याचे दंडक

दुराचार शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि लैंगिक असला तर त्या त्या प्रकारानुसार कारवाई केली जाते, परंतु पहिली खबर देताना घेण्याची प्राथमिक काळजी सर्व प्रकारांत सारखी असते. ती कोणती हे खाली दिले आहे:

१. दुराचाराची घटना समोर आल्यानंतर भेदरून जाऊ नका आणि घालून दिलेल्या  दंडकांचा शांतपणे अवलंब करा.

२. पीडित विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या आणि फक्त तपशील चांगला समजण्यापुरतेच प्रश्न विचारा. अनावश्यक तपशिलात शिरू नका.

३. पीडिताला दोषी धरू नका, उलट त्याला “तुझी यात काही चूक नाही “ हे समजावून सांगा.

४. पीडिताला त्यांच्या परिवाराकडून मदत हवी आहे का हे विचारा.

५. खोटी आश्वासने न देता ‘आम्ही तुला मदत करू” हा भरवसा द्या.

६. अधिकाऱ्यांकडे जाणे का आणि कसे आवश्यक आहे ते पीडितास समजावून सांगा.

७. हे प्रकरण फक्त “बाल सुरक्षा समिती “ यांच्याकडे नेऊन त्यांच्याशी चर्चा करा. सहयोगी संस्थांकडे जायचे किंवा नाही ते बाल सुरक्षा समिती ठरवेल.

८. ही चर्चा झाल्यानंतर शाळा, जिल्हा, आयुक्त किंवा राज्य सचिव या क्रमाने काहींना अथवा सर्वांना यांना प्रकरणाची माहिती देण्यात यावी.

९. या प्रकरणाच्या तपासातील आणि दाखल झालेल्या तक्रारीच्या बाबत काय प्रगती होत आहे हे जाणून घ्या.

१०. दुराचार घरी होत असेल आणि पीडित घरी जाऊ इच्छित नसेल तर तात्काळ बाल सुरक्षा समितीला ही माहिती कळवा.

११. पीडितास योग्य ते समुपदेशन मिळेल हे पहा.

मुलांचे समुपदेशन

मुलांचा विश्वास संपादन करणे आणि टिकविणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे.

१. मुलाखत हा मुलांच्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा मार्ग नव्हे. प्रथम तुम्ही काय आणि कशी मदत करणार आहात ते समजावून सांगा.

२. त्यांना गोष्टी आणि उदाहरणे सांगून आशेचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करा.

३. गोपनीयतेचे बंधन पाळले जाईल हा भरवसा द्या.

४. आवश्यक ती जीवन कौशल्ये पुरेशी विकसित झाली नसल्यास त्यांच्या विकासाचा क्रम ठरवून तो नियोजनबद्ध करा.

५. आपल्या भावनांना वळण कसे द्यायचे ते शिकवा.

६. मुलाला साह्यभूत ठरणाऱ्यांच्या वर्तुळाला समुपदेशनाबद्दल अवगत करा.

७. गरज पडल्यास तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घेण्यास सांगा.

८. वर्तन विषयक समस्या असणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष न करता पुढील गोष्टी करा.

  • आदर आणि कणव यांचे महत्त्व विशद करा.
  • अनुचित आणि घातक वर्तनाचे भावी परिणाम समजावून सांगा.
  • या मुलांच्या अंगी असलेल्या क्षमतांचा वापर आणि विकास कसा करता येईल ते ठरवा.

पालकांना वृत्त कळविण्यासंबंधी

आपल्या पाल्याविषयी माहीत नसलेली एखादी गोष्ट कळल्यावर पालकांची प्रतिक्रिया वेगळी होऊ शकते. त्यामुळे त्यांना कळविताना आपला सूर मृदू आणि आदरार्थी असला पाहिजे. पालकांना त्यांच्या मुलावरील घटित वा आशंकित अत्याचाराबद्दल सांगताना आपण पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

१. पालकांना खासगी भेटीबद्दल विचारणे.  सार्वजनिक चर्चा करू नये. 

२  त्यांना हे लक्षात आणून द्यावे की त्यांच्या पाल्याबरोबर दुराचार झाला आहे.

३. त्यांना त्यांच्या पाल्याच्या आजमितीला असलेल्या गरजांबद्दल जाणीव करून द्यावी.

४. मुलाच्या समस्येवरील सर्वात चांगला उपाय काय असेल याबद्दल चर्चा करा.

५. पालकांना सूचना, साधने आणि सुविधा उपलब्ध करून द्या, जेणेकरून ते पाल्याची अधिक चांगली काळजी घेऊ शकतील.

६. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ याबद्दल पालकांना माहिती देऊन गुन्हा नोंदविणे का आवश्यक आहे ते पटवून द्या.

७. पालक आपल्या पाल्याची सक्षमता वाढवीत असताना त्यांना योग्य ती मदत करा.

पालकांना प्रत्येक गोष्ट कळविणे अनिवार्य नाही. परिस्थितीचा साकल्याने विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे.

बालसुरक्षा दक्षता सूची

मुलांना भेटण्याआधी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे  त्या खाली दिलेल्या आहेत.

१. सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि  कर्मचाऱ्यांचे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असले पाहिजे.

२. सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी ओळखपत्र संस्थेत असताना सहज दिसेल असे लावले पाहिजे.

३. मुलांना प्रत्येक समारंभा पूर्वी सुरक्षा सूचना देण्यात याव्यात.

४. सर्व सोयी सुविधा चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.

५. वाहतूक सुरक्षेसंबंधी सूचनांचे पालन होत आहे हे पाहिले पाहिजे.

६. कर्मचाऱ्यांना गोपनीयतेचे महत्त्व समजवून दिले पाहिजे आणि त्यांची सर्वकाळ गोपनीयता राखण्यासंबंधी प्रतिज्ञा घेतली पाहिजे.

७ अत्याचाराचे प्रकरण हाताळताना वृत्तांकनासंबंधी घालून दिलेले दंडक पाळले पाहिजेत.

८. मुलांच्या समुपदेशनासंबंधी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे.

९. पालकांना माहिती देण्यासाठी घालून दिलेले दंडक पाळले पाहिजेत.

१०. नवीन दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या आठवड्यातच या धोरणाची संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे.

११. सर्व विद्यमान आणि नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांना हे धोरण पूर्णपणे समजले आहे किंवा नाही हे पाहिले गेले पाहिजे.

शब्दमंजुषा

कर्मचारी यामध्ये विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, शिक्षक, कर्मचारी, स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी या सर्वांचा समावेश होतो.

बालवयीन कोणीही अठरा वर्षाखालील व्यक्ती ही बालवयीन ठरते.

POCSO बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ म्ह Protection of Children against Sexual Offences Act हा कायदा सर्व लिंगी बालकांसाठी आहे. मुलाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन न्याय प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर मुलाला संरक्षण दिले आहे. मुलाला वैद्यकीय मदत लागल्यास ती संपूर्णपणे मोफत दिली जाते. या कायद्यात आरोपी दोषी आहे असे गृहीत धरले जाते आणि त्याने आपले निर्दोषत्व पुराव्याने सिद्ध करावयाचे असते. या कायद्यात लैंगिक अत्याचाराचे तीन प्रकार दाखवले आहेत.

१. लैंगिक आघात : मुलाच्या खासगी अवयवांना लैंगिक हेतूने स्पर्श करणे याला लैंगिक आघात म्हटले आहे.

२. लैंगिक छळ : स्वतःच्या खासगी अवयवांचे प्रदर्शन करणे, पोर्नो चित्रे आणि क्लिप दाखवणे, मुलाला वाच्यता करू नये यासाठी धमकावणे इ o प्रकार हे छळवणूक यात मोडतात.

३. मुलांचा पोर्नोग्राफी साठी वापर: यात मुलांची खासगी अवयव दर्शवणारी चित्रे व व्हिडियो तयार करणे आणि प्रदर्शित करणे इ बाबींचा समावेश आहे.

बाल सुरक्षा समिती CPC संस्थेने नियुक्त केलेली चार सदस्य समिती, जिला दुराचाराची  सर्व माहिती सर्व प्रथम दिली पाहिजे.

शारीरिक दुराचार शरीराला इजा करणे अथवा हानी पोचवणे.  उदा ० मारहाण करणे, थप्पड/ ठोसा मारणे इ

भावनिक दुराचार एखाद्या व्यक्तीला शब्दांनी वा बोलून घायाळ करणे आणि मनाला हानी पोचवणे

उदा o धमकी देणे, अपमान करणे, कारस्थाने करणे

सामाजिक दुराचार एखाद्या  व्यक्तीच्या संबंधांमध्ये बाधा आणणे किंवा हानी पोचवणे या हेतूने तिच्यावर पाळत ठेवणे, हालचालींचे नियंत्रण करणे आणि अडथळा आणणे.

लैंगिक दुराचार जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिच्या संमतीशिवाय किंवा जबरदस्तीने मनाला अथवा शरीराला  इजा पोचवते  किंवा हानी करते, तेव्हा तो लैंगिक दुराचार ठरतो. बालवयीन व्यक्तीला संमती देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे बालवयीन मुलामुलीने स्वेच्छेने केलेला लैंगिक व्यवहार सुद्धा लैंगिक दुराचार समजला जातो. उदाहरणार्थ गुह्यांगाला स्पर्श करणे वा चुंबन घेणे, छाती वा नितंबाला स्पर्श करणे, उत्तान चित्रे वा चलच्चित्रे दाखवणे .